सरकारचा डीजेला जोरदार विरोध, न्यायालयानं निकाल राखून ठेवला
गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला आहे. त्यामुळे डीजे आणि डॉल्बीबाबत न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.

मुंबई : डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. त्यामुळे तूर्तास तरी विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीबाबत हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ध्वनी प्रदुषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणं शक्य नाही.
डीजेची किमान पातळी हीच ध्वनी प्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे, असा दावा करत राज्य सरकारानं डीजे आणि डॉल्बी सिस्टिमला हायकोर्टात जोरदार विरोध केला. काहीवेळा एखाद्या गोष्टीवर बंदी घालणं हे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचाच एक भाग असतं, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.
डीजे सिस्टिम केवळ सुरू करताच ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडतात, त्यामुळे परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही. विसर्जन मिरवणुकीसारख्या सोहळ्यात पोलीस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत. राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदुषणासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांत 75 टक्के प्रकरणं डीजेची आहेत, अशी माहीती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टात दिली.
ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर बंदी का? असा सवाल करत प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेनं अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. मुळात यासंदर्भात कायदा अस्तित्त्वात असतानाही त्याची योग्यपद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
तसेच पोलीस हे आयोजकांना सोडून साऊंड सिस्टिम भाड्यानं देणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकत घेऊन या व्यवसायात उतरलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंतही या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात झाली की विसर्जन मिरवणुकांत डीजेंच्या वापराचा मुद्दा उपस्थित होतो. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटीसा पाठवून साऊंड सिस्टिमची गोदामं गणेशोत्सवापर्यंत सील केली आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे व्यवसायावर गंडांतर येत असतील तर या व्यवसायात आलेल्या तरुणांनी करायचं काय? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. "डीजे बंदीचं प्रकरण कोर्टात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळ जर तयार असतील. तर डीजे वाजवा", असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं डीजे मालकांनी सांगितलं होतं.
तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही गणपती विसर्जनात कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारचं अशी भूमिका घेतली होती.
संबंधित बातम्या
डीजेवाल्यांना राज ठाकरेंचं समर्थन
कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच: उदयनराजे
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















