मुंबई : 500 चौरसपर्यंत फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही, तर 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.


आगामी मुबंई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वचननाम्याची रुपरेषा उद्धव ठाकरे यांनी थोडक्यात मांडली. या वचननाम्यात येत्या पाच वर्षात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या अनेक मुद्द्यांना शिवसेनेने हात घातला आहे.

मुंबईकरांना त्रास होऊ देणार नाही

मुंबईकर हा फक्त कर भरण्यासाठीच आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. मुंबईकर आणि शिवसेनेचं नातं घट्ट आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीपूर्वी दिली.

आमच्या घोषणा म्हणजे 'चुनावी जुमला' नाही, आमचा वचननामा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


 

मुंबईकरांसाठी आरोग्य कवच योजना

मुंबईकरांना मोफत आरोग्य सुविधा देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. सरकारच्या सुविधांपासून वंचित राहिलेल्या मुंबईकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सुरु करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ दे

युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही. पण सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ द्या, असा विश्वासही शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केला. तसंच पारदर्शक कारभारापर्यंत अनिल परब यांनी उत्तर दिलेलं आहे, असंही ते म्हणाले.