मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीनं पीएमएलए कोर्टात विविध 9 याचिका दाखल केल्या आहेत. आपण फरारी नसून आपल्याला विचारण्यात आलेल्या सर्व प्रशांनी उत्तरं आपण दिली असल्याचा दावा नीरव मोदीने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.


पीएनबी घोटळ्यासंबंधी मी चौकशीसाठी सर्वोतपरी मदत करत आहे. मात्र ईडी आपल्यावर खोटे आरोप करत आहे, असा आरोपही नीरव मोदीनं केला आहे. आपल्याशी संबंधीत सर्व खटले विशेष सीबीआय कोर्टात वर्ग करण्यात यावे, जेणेकरुन सगळ्यांची एकत्रित सुनावणी करण्यात येईल, अशी मागणीही नीरव मोदीने केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता 19 नोव्हेंबरला होणार आहे.


काय आहे घोटाळा?


पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत तब्बल 12 हजार 700 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली आहे.


नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्याने सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.


लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं हमीपत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.


पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.


कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.