नवी मुंबई : नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीत केमिकल वेस्ट नष्ट करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आसपासच्या तब्बल 14 गावांना भूकंपासारखे हादरे बसले.


तळोजा एमआयडीसीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी असून या कंपनीत रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जातं. आज सकाळी खड्डा खोदून त्यात रसायनांनी भरलेले दोन ड्रम टाकण्याचं काम सुरू होतं. यावेळी दोन केमिकल्सची रिऍक्शन झाल्याने हा भीषण स्फोट झाला.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती की अजस्त्र जेसीबी पोकलेन मशीनही उलटली. यात जेसीबी चालवणारा कामगार जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संतोष धर्मा पाटील असं जखमी झालेल्या कामगाराचं नाव आहे.

स्फोटामुळे भेदरलेल्या ग्रामस्थांनी कंपनीत धाव घेत गोंधळ घातला. यानंतर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पोलीस, फायर ब्रिगेड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही कंपनी परिसरातील गावांसाठी जीवघेणी ठरत असून ती बंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं.