मुंबई: मनी लॉंड्रिंग (Money Laundring) प्रकरणी डी कंपनीशी संबंधित असलेल्या दोन आरोपींनी आपले लागेबांधे हे राजकीय नेत्यांशी असल्याची माहिती दिल्याचा दावा एनआयएने केला आहे. दाऊद कंपनींशी संबंधित या आरोपींचे राजकीय नेत्यांसोबत आर्थिक व्यवहार होते, काही राजकीय नेत्यांची नावं ही या आरोपींच्या हिटलिस्टवर होती असा दावाही एनआयएने केला आहे. 


आरिफ अबु बकर शेख आणि शकील अबु बकर शेख हे दोघे भाऊ छोटा शकीलसाठी मनी लॉंड्रिंगचे काम करतात.  दोघेही मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी असून छोटा शकीलचा पैसा ते हवालामार्फत मुंबईतून परदेशात पाठवतात. या दोघांनी राजकीय नेत्यांसाठीही हवालाचे काम केलं असून त्याबद्दल अधिकचा तपास करण्यासाठी या दोघांचीही कस्टडी देण्यात यावी अशी मागणी एनआयएने केली आहे.


या दोघांकडून दोन लिस्ट मिळाल्या असून त्यामध्ये एक लिस्ट ही राजकीय नेत्यांशी असलेल्या आर्थिक संबंधांची आहे. दुसरी लिस्ट ही छोटा शकील, अंडरवर्ल्ड आणि आयएसआय संबंधी असून त्यामध्ये हिटलिस्टवर असलेल्या राजकीय नेत्यांची नावं आहेत. म्हणजे जे-जे राजकारणी अंडरवर्ल्डच्या हिटलिस्टवर आहेत त्यांची नावं यामध्ये आहेत. आता यामध्ये कोण टार्गेट होतं, कोणाशी आर्थिक व्यवहार होते या सर्वांची चौकशी करण्यासाठी या दोघांची कस्टडी देण्यात यावी अशीम मागणी एनआयएने केली आहे. 


आरिफ अबु बकर शेख हा छोटा शकीलच्या बहिणीचा नवरा आहे. त्यामुळे हाच छोटा शकीलचा मुंबईतील सर्वात मोठा कॉन्टॅक्ट होता. आरिफ शेखच्या माध्यमातूनच मुंबईतील ऑपरेशन करण्यात येत होते. याच्या माध्यमातूनच राजकारण्यांशी संबंध ठेवण्यात येत होते असा दावा एनआयएने केला आहे. 


एनआयएच्या पथकाने सोमवारी मुंबई आणि उपनगरात 29 ठिकाणी छापे टाकले आहेत. 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले. ज्या लोकांवर छापे टाकण्यात आले आहेत त्यामधील लोक हे 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निर्दोष सुटले होते.


संबंधित बातम्या: