NIA : मुंबईत (Mumbai) सोमवारी एनआयएने (NIA) केंद्रीय तपास यंत्रणेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल 29 ठिकाणी छापेमारी केली. आत्तापर्यंत पोलिसांनी काही नागरिकांना अटक देखील केली आहे. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात NIA ने छापे टाकले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 अड्ड्यांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा हात आहे. याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान आज एनआयएनच्या चौकशीच्या चौथ्या दिवशी डी-गँगशी संबंधित सदस्य चौकशीसाठी NIA मुख्यालयात हजर झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


तीन ते चार जण कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले
एनआयए चौकशीच्या चौथ्या दिवशी डी-गँगशी संबंधित सदस्य चौकशीसाठी NIA मुख्यालयात येऊ लागले. आज तीन ते चार जण कार्यालयात चौकशीसाठी पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एनआयएने सोमवारी मुंबई आणि उपनगरातील 29 ठिकाणी छापे टाकले. एका महिलेसह 21 वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. हे सर्व एकतर डी-गँग, त्यांचे नातेवाईक किंवा साक्षीदार आहेत, तसेच 93 बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष आहेत. कालह ईडी आणि आयबीचे अधिकारी देखील या प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएच्या मुख्य कार्यालयात आले होते.


काल 18 सदस्यांची चौकशी


चौकशीच्या तिसऱ्या दिवशी मुंबईतील NIA मुख्यालयात 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले, तर काही जण अजूनही NIA ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.


हसिना पारकर संबंधित चौकशी


ईडीने नवाब मलिक यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मलिक यांची दाऊदसोबत असलेल्या संबंधांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न ईडीकडून करण्यात येत आहेत. दाऊद इब्राहिम विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासादरम्यान मलिकांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित जमीन व्यवहाराशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात आरोपी असल्याचंही बोलंल जातंय