NIA : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबईत ईडी पथकांच्या अनेक धाडी पडल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती व त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील NIA मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे. 


दाऊदसोबत असलेल्या संबंधांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न


ED ने यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात ईडी चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने नवाब मलिक यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मलिक यांची दाऊदसोबत असलेल्या संबंधांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न ईडीकडून करण्यात येत आहेत. दाऊद इब्राहिम विरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या तपासादरम्यान मलिकांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याशी संबंधित जमीन व्यवहाराशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात आरोपी असल्याचंही बोलंल जातंय


सुमारे 18 सदस्यांची चौकशी


चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील NIA मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले, तर काही जण अजूनही NIA ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.


NIA चा छापा


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे अनेक साथीदार, शार्प शूटर आणि हवाला ऑपरेटर यांच्यावर हे छापे टाकण्यात आले होते. मुंबईतील भेंडीबाजार, माहीम, नागपाडा, गोरेगाव या परिसरात एनआयएने धाडी टाकल्या. माहीम परिसरात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यापैकी एक छापा माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्या घरी टाकण्यात आला होता. पोलिसांनी सुहेल खंडवानी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ग्रँट रोड येथून ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्व लोक 93 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात साक्षीदार आहेत किंवा निर्दोष सुटले आहेत. तसेच ते नातेवाईक आहेत किंवा डी-गँगशी जोडलेले आहेत. याबाबत तपास यंत्रणा मनी लाँड्रिंग तसेच या प्रकरणातील आरोपींचे संबंध तपासण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी काही पुरावे मिळविण्यासाठी पोलीस मनी ट्रेल्स आणि बँक स्टेटमेंट तपासत आहेत.