ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसरात काल मध्यरात्री 12 च्या सुमारास काही अज्ञातांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी कार्यालयात कोणीही नसल्याने दगडफेकीत कोणालाही दुखापत झाली नाही. पण पक्ष कार्यालयाच्या बाहेर लागलेल्या बॅनरचं नुकसान झालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान संबंध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे


मनसे वाहतूक सेनेचे कळवा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी यासंदर्भात एबीपीसोबत संवाद साधला. "काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इथल्या पदाधिकाऱ्याने म्हटलं होतं की मनसे सोडून राष्ट्रवादीत या, असं केलं नाही तर कार्यालयाची तोडफोड करु. मी त्यांचं ऐकलं नाही तर त्यावेळी स्थानिक पोलीस म्हणजेच मुंब्रा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी कार्यालयाबाहेर बंदोबस्त लावला होता. पोलीस होते तेव्हा कोणी आलं नाही परंतु पोलिसांचा बंदोबस्त हटताच ते लोक आले आणि त्यांनी दगडफेक केली," असा आरोप इरफान सय्यद यांनी केला.


मनसेच्या कार्यालयावर काल मध्यरात्री तीन जणांनी दगडफेक केली आणि ते लोक दुचाकीवरुन आले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. या घटनेची माहिती मनसेच्या बड्या पदाधिकाऱ्यांसह पोलिसांनाही दिली आहे, असं सय्यद यांनी सांगितलं.


इरफान सय्यद म्हणाले की, "गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं होतं की, मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हा सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेत असावा. पण राजकीय पक्ष त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन तो राजकीय मुद्दा बनवत आहेत."


दरम्यान इरफान सय्यद यांनी या घटनेची तक्रार मुंब्रा पोलिसात केली आहे. यानंतर पोलिसांनी मनसे कार्यालयाची सुरक्षा पुन्हा एकदा वाढवली आहे. आता दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.


 संबंधित बातम्या