मुंबई : "मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. आमचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलतील आणि त्यातून मार्ग निघेल," अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मुंबईत 2 एप्रिल रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मशिद, मदरशांवर धाडी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील मुस्लीम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तर पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला.  


संदीप देशपांडे म्हणाले की, "पुणे, कल्याणमधील काही मुस्लीम मनसे कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. आमचे त्या ठिकाणचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यांशी चर्चा करतील. काही लोक गैरसमज करुन देतात, पण काही हरकत नाही. आमचे पदाधिकारी त्यांच्याशी बोलतील आणि त्यातून मार्ग निघेल."


काही मुस्लीम संघटनांचा राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरील भोंगे काढावे अन्यथा त्याच्यासमोर डबल स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर काही मुस्लीम संघटनांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आम्ही मशिदीवरील आवाज कमी करु असं सांगत राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावर संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले की कुठलाही प्रार्थनेला आमचा विरोध नाही. पण आपल्या प्रार्थनेचा दुसऱ्याला त्रास होऊ नये. जर ही काळजी लोक घेत असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे."


'आम्हाला अक्कल शिकवू नका'
द्वेष पसरवू नका, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावरीही संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड यांना मला एकच सांगायचं आहे की 1999 मध्ये त्यांचा पक्ष स्थापन झाला. पक्ष स्थापन झाल्यापासून मराठा-ब्राह्मण मराठा-ओबीसी या जातीजातींमध्ये ज्यांनी भांडण लावली त्यांनी आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाही. महाराष्ट्राची काळजी सगळ्यात जास्त राज ठाकरे यांना आहे आणि आव्हाडांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांनी अक्कल आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये.


कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना माझं निवेदन आहे, मला हेच सांगायचं की आम्हाला अक्कल शिकवण्याआधी आधी तुम्ही किती आणि कुठे भांडणं लावली याचा तुम्ही विचार करावा. राज ठाकरेंना महाराष्ट्राची काळजी आहे, त्यामुळे कुठली गोष्ट कशापद्धतीने बोलायची, हाताळायची हे आम्हाला माहित आहे. जर कायद्यात 50 डेसिबलच्या वर आवाज नको, तर त्याचं पालन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, त्यांनी ते पाळावं."


गुगलवर मुंब्रा आणि टेररिस्ट दोन जरी शब्द टाकले तर...
राज ठाकरे यांनी मदरश्यात धाडी टाकल्या तर काय काय सापडेल असा दावा केला होता. राज यांचा हा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावला आहे. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, "जितेंद्र आव्हाडांना एकदा गुगलवर टाईप करायला सांगा, 'मुंब्रा आणि टेररिस्ट दोन जरी शब्द त्यांनी टाकले ना तर सगळ्या बातम्या येतील आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळेल."


संबंधित बातम्या