Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मागील महिन्यात, 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवायचे की नाही, याबाबत तपास अधिकारी विचारात असल्याची माहिती आहे. राऊत या प्रकरणातील पीडित असून त्यांची साक्ष, जबाब महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.


सूत्रांनी सांगितले की, अनेकदा हे नेते त्यांच्या पीए आणि इतर जवळच्या व्यक्तींचे फोन वापरतात. ज्यांनी या व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यांना कोणतीही महत्त्वाची माहिती चुकवायची नव्हती. त्यामुळेच स्वीय सहाय्यकांचेही फोन टॅप करण्यात आले. टॅप करण्यात आलेला फोन नंबर खडसेंचाच होता, याची खातरजमा करण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. खडसे हे या खटल्यातील पीडित असून या प्रकरणातील साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 


या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कुलाबा पोलिसांनी कथित फोन टॅपिंग प्रकरणात गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा तब्बल दोन तास जबाब नोंदवला. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागाचे (एसआयडी) प्रमुख असताना हे फोन टॅपिंग झाले. अतिरिक्त पोलिस आयुक्त (विशेष शाखा) राजीव जैन यांच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम १६५ आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोन वेळेस जबाब नोंदवला. फोन टॅप करण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली असल्याचे शुक्ला यांनी याआधीच म्हटले होते. 


फोन टॅपिंगमुळे आपल्या गोपनीयतेवर आघात झाल्याचे खडसेंनी म्हटले आहे.  शुक्ला यांनी त्यांचे फोन कॉल्स इतर कोणाच्या तरी सूचनेनुसार टॅप केले असल्याचेही त्यांनी म्हटले.