Sharad Pawar : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणूक निकालाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्यसभेतील सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज चिंतन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. 


संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीत बरीच चर्चा सुरू होती. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडे असलेली मते फुटल्याने नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषगांने काळजी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले असल्याची माहिती आहे. 


नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संख्याबळाचे गणित महाविकास आघाडीच्या बाजूने होते. मात्र, तरीदेखील सहाव्या जागेवर झालेल्या निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. अपक्षांकडून मते फुटली असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. महाविकास आघाडीची मते फुटली नसल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले होते. राज्यसभा निवडणूक निकालानंतर आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. 


दरम्यान, राज्यसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना या निकालाने फारसा धक्का बसला नसल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा एक मत अधिक मिळाले आणि हे मत भाजपच्या गोटातून आले असल्याचे त्यांनी म्हटले होते.