मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीमधील राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड झालं आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील.


महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन रस्सीखेच होती.


राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार ठरला, डॉ. भागवत कराड यांना संधी


काँग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही होती. मात्र इथेही शरद पवारांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसलं. त्यामुळे आता फौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार असतील.


राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे.


दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत


महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार?
भाजप आपल्या आमदारांच्या संख्येवर तीन सदस्य राज्यसभेवर पाठवणार आहे. यामध्ये साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेत पाठवणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर जातील. याशिवाय काँग्रेसकडून युवा नेतृत्त्व राजीव सातव यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.