नवी दिल्ली : राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित झालेलं आहे. या एका जागेसाठी मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नावं चर्चेत होती. पण अखेर राहुल गांधींच्या विश्वासातले राजीव सातव यांच्याच नावावर मोहोर उमटली आहे.


राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. 2009 मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार, तर 2014 मधून हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांच्याही विश्वासू गोटात असलेले जे मोजके नेते आहेत त्यात राजीव सातव यांचा समावेश होतो.

45व्या वर्षी त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. इतक्या कमी वयात, तेही काँग्रेससारख्या पक्षाकडून राज्यसभेवर जाण्याची संधी क्वचितच मिळाली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता राहुल ब्रिगेडमधल्या नेत्यांना वयाचा विचार न करता संधी मिळाल्याचं यानिमित्तानं दिसतं आहे.

राज्यसभेसाठी भाजपचा तिसरा उमेदवार ठरला, डॉ. भागवत कराड यांना संधी

राजीव सातव यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात पंचायत समितीतून केली होती. नंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात काँग्रेस तरुण नेतृत्वावर अधिक विश्वास ठेवणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे.

राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार?

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 खासदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.