नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. डॉ. भागवत  कराड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या नावासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हंसराज अहिर, विजया रहाटकर यांच्यासह अनेक नावं चर्चेत होती. परंतु डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. भाजपने विविध राज्यांमधील पाच उमेदवारांच्या नावाचं प्रसिद्धपत्रक जारी केलं. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. याशिवाय अमरीश पटेल यांना विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.


राज्यसभेसाठी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी बुधवारी (11 मार्च) जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र तिसऱ्या जागावर कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेन्स होता. परंतु भाजपने खडसे, अहिर, रहाटकर यांचा डावलून डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी दिली. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.

डॉ. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर आहेत. शिवाय ते औरंगाबादचे उपमहापौर देखील होते. सध्या ते मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. डॉ. भागवत कराड हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. राज्यसभेची उमेदवारी अनपेक्षित आहे. मात्र आपले स्वप्न पूर्ण झालं आहे, असं त्यांनी म्हटलं.

राज्यसभेसाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल तर, भाजपकडून उदयनराजे, रामदास आठवलेंना उमेदवारी जाहीर



राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे.

Rajya Sabha Election | राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी
राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Rajyasabha Election | एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, राज्यसभा निवडणुकीवरgन काँग्रेस अडली