NCB Mumbai एनसीबीची मुंबईत मोठी कारवाई; चार कोटींचे हेरॉइन जप्त, एकाला अटक
NCB Mumbai seized Rs 4 cr heroin : एनसीबीकडून अमली पदार्थाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. मुंबई विमानतळ कार्गो कॉम्प्लेक्समधून चार कोटींचे हेरॉइन जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आज मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समधून तब्बल चार कोटीचे हेरॉइन ताब्यात घेतले. या एक प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. सहार इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पार्सलद्वारे अमली पदार्थ येणार असल्याची माहिती होती. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून संशयित वस्तूंची तपासणी सुरू केली. या तपासणीत कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमधील एका पार्सलमध्ये संशयित पावडर आढळली. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही पावडर हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. जवळपास ७०० ग्रॅमची ही हेरॉइन असून त्याची किंमत अंदाजित चार कोटी रुपये आहे.
NCB Mumbai seized 700 g of off white powder purported to be heroin, valued at Rs 4 cr, at Conference Hall, Int'l Courier Terminal Sahar Cargo Complex, Mumbai from Courier Parcel. Consignee's statement recorded y'day at Vadodara. His interrogation is on at Mumbai office today: NCB
— ANI (@ANI) November 4, 2021
एकाला अटक
एनसीबीने या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे पार्सल वडोदरामधील एका व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीला चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या प्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून एनसीबीचे मुंबई झोनल युनिट चर्चेत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून एनसीबीच्या कारवाईवर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मलिक यांच्या आरोपामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
तर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप याआधी करण्यात येत होता. त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता थेट जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन या संघटनांनी ही तक्रार दाखल केली आहे.