मुंबई : एनसीबीचे डीडीजी आणि एनसीबीच्या स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह (Sanjay Singh) मुंबईत दाखल झालेत. काल एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून 6 केसेसचा चार्ज काढून घेण्यात आला होता. त्यानंतर या सर्व 6 केसेस संजय सिंह यांच्या टीमकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा चार्ज घेण्यासाठी आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. आणि ह्या सहाही केसेसचा तपास संजय सिंहच करणार आहेत.


दरम्यान, विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधतांना एनसीबीचे डीडीजी आणि एनसीबीच्या स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह यांनी आम्ही 6 केसेसचा तपास करणार असल्याची पुष्टी दिली. यासंदर्भातलं परिपत्रक देखील आम्ही काढलं आहे. त्यामुळे अजून काही माझ्याकडे सांगण्यासारखं नसल्याचं संजय सिंह म्हणाले. तर समीर वानखेडे हे विभागीय संचालक आहेत. तर या भागात होणाऱ्या घडामोडींसंदर्भात त्यांची मदत घेतली जाणार असल्याचं संजय सिंह यांनी सांगितलं. सुरुवातील आधी आम्ही ही 6  प्रकरणं आमच्या ताब्यात घेऊ त्यानंतरच यासंदर्भात अधिक प्रतिक्रिया देता येईल असं संजय सिंह म्हणाले.


Sameer Wankhede समीर वानखेडेंकडून तपास काढला; नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात...


कोण आहेत संजय सिंह?


संजय सिंह हे 1996च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी अनेक प्रमुख पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. ओडिशा पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर ओडिशा पोलीस दलातच ते महानिरीक्षक होते. पुढे सीबीआयमध्ये त्यांनी सेवा दिली. तिथे अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली. सीबीआयमध्येही ते महानिरीक्षक या पदावर होते. तिथून ते एनसीबीमध्ये आले. सध्या ते उपमहासंचालक (ऑपरेशन) या पदाचा कार्यभार पाहत आहेत. सिंह यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे मुंबईतील हायप्रोफाइल प्रकरणं सोपवण्यात आली आहेत, असे बोलले जात आहे.


Nawab Malik on Sameer Wankhede : शर्ट 70 हजारांचा तर बूट 2 लाखांचे; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा


दरम्यान, काही दिवसांपासून समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे नाव खूप चर्चेत आहे. खासकरुन मुंबईमधील  क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर  समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. मात्र आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला आहे. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे.


आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.