Mumbai Cruise Drug Case :  मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे गौप्यस्फोट केले आहेत. आज भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.


कोण आहेत सुनील पाटील
सुनील चौधरी पाटील हे धुळ्याचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचा मानला जातो.  बबनराव पाचपुते जेव्हा 2009 ते 2014 मध्ये NCP मधून आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी तो त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसायचा.  



भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल 
भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्याशी देखील सुनील चौधरी पाटील यांची जवळीक होती. मात्र नंतर मेटेंशी काही वाद झाल्यानं ते दूर झाले.  सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत असा आरोप केल्यानंतर आता सुनील पाटील यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुनील पाटील भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्या सोबत आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये मनीष भानुशाली आणि सुनील पाटील एकत्र पाहिला मिळत आहे.



काय म्हणाले मोहित कंबोज
मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा देखील कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही कंबोज यांनी सांगितलं.