मुंबई: एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून पाच प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणाचाही समावेश आहे. समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांच्याकडून पाच प्रकरणांचा तपास काढून घेतला असला तरी एकूण २६ प्रकरणांची चौकशी आवश्यक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 


आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी सातत्याने काही दिवस पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उभे केले होते. त्याशिवाय समीर वानखेडे यांनी अवैध मार्गाने सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या लाइफस्टाइलवरही नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. 






नवाब मलिक यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. एकूण २६ प्रकरणे असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मलिक यांनी म्हटले. ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले. 


आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.


जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार


दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप याआधी करण्यात येत होता. त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना आता थेट जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन या संघटनांनी ही तक्रार दाखल केली आहे.