मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या नातेवाईकांवर आरोप केल्यानंतर आता मोहित कंबोज आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे. ज्यावेळी एनसीबीने क्रुजवर कारवाई केली त्यावेळी तो बोटीवर होता. मात्र अभिनेते शाहरुख खाना यांना मुलगा आर्यन खान यांचा आणि वृषभ सचदेव याचा काहीही संबंध नाही, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं. 


ऋषभ सचदेवला कुठलेही व्यसन नाही. नवाब मलिक यांनी जे आरोप केले आहेत त्यांनी ते सिद्ध करावे अन्यथा मी त्यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा करणार आहे. मी गेल्या दीड वर्षापासून भाजपचा पदाधिकारी नाही. या प्रकरणाचा भाजपशी काहीही संबंध नाही. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणजे शरद पवारांशी संबंध जोडायचा का? असा सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केला. नवाब मलिक कचरा किंग आहेत. मलिक यांच्या कुठल्याही प्रश्नाला मी कुठेही उत्तर द्यायला तयार आहे त्यांनी माझ्याशी चर्चेसाठी यावं, असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं.


कोण आहेत मोहित कंबोज? 


मोहित कंबोज हे भाजपच्या मुंबई युनिटचे माजी सरचिटणीस आहेत. कंबोज हे 2016-19 या काळात भारतीय जनता पक्षाच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्ष होते. ऑगस्ट 2019 मध्ये त्यांची मुंबई भाजपच्या सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली होती. 2019 मध्ये त्यांना मुंबई भाजपाच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आलं होतं. 2013 ते 2014 दरम्यान मुंबई भाजपाचे ते उपाध्यक्ष होते. दिडोंशी मतदारसंघामधून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर 2014 साली विधानसभा निवडणूकही लढवली आणि पराभूत झाले. 2013-2016 उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्ष होते. यापूर्वी त्यांनी कंबोज हे आडनाव बदलून भारतीय ठेवलं होतं, त्यावेळी मुंबईत त्यांनी बॅनर लावले होते. त्याच्याविरोधात विविध आर्थिक घोटाळ्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे.