मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. 






 


'आम्ही अजून काही बोलायचं का?' : संजय पांडे
मागील दोन दिवसात मुंबई पोलीस आरोपांच्या केंद्रस्थानी होती. त्यावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आणि 'आम्ही अजून काही बोलायचं का?' असं एका वाक्यात उत्तर देऊन पोलिसांची भूमिकाच एकप्रकारे स्पष्ट केली आहे.


नवनीत राणांचे पोलिसांवर गंभीर आरोप
नवनीत राणा आणि रवी राणा यांना ज्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिलला अटक करण्यात आली त्या दिवसाचाच हा व्हिडीओ असल्याचं समजतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासास्थाबाहेर हनुमान चालीसाचा वाचन करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. परंतु प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. यानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. मागासवर्गीय असल्याने पाणी दिलं नाही असा आरोप करत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. त्यावर कारवाई करत लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवून 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट करुन उत्तर दिलं आहे. 


नवनीत राणा आरोप करत आहेत, तसं काहीच घडलं नाही, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण 
खासदार नवनीत राणांनी कोठडीत त्यांनां हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तूस्थिती नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल"


संबंधित बातम्या