Maharashtra Home Minister Dilip Walse Patil : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी कोठडीत त्यांनां हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) नवनीत राणांच्या आरोपांसंदर्भात स्वत: चौकशी केल्याचं सांगितलं. तसेच, त्या आरोप करत आहेत, तसं काहीच घडलं नसून त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवरही गृहमंत्र्यांनी भाष्य केलं. येत्या दोन दिवसांत राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबतचा निर्णय दिला जाईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबतचा निर्णय घेतील, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 


खासदार नवनीत राणांनी कोठडीत त्यांनां हीन वागणूक दिली जात असल्याचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्यचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तूस्थिती नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये 1 मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत. त्यावरुन  सध्या चर्चांना उधाण आलं आहे. सभेला अद्याप परवानगी मिळाली नसली तरी मनसेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासर्व घडामोडींवर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, "येत्या दोन दिवसांत राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबतचा निर्णय दिला जाईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबतचा निर्णय घेतील. सदर ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन ते निर्णय घेतील. सभेला परवानगी द्यायची की, नाही ते पोलीस आयुक्त ठरवतील. राज्य सरकार ठरवणार नाही." भोंग्याबाबत काल सर्वपक्षीय बैठक झाली. तरीही त्यांना जनसभा घ्यायचीय तर तो त्यांचा निर्णय असेल, असं गृहमंत्री म्हणाले. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


राज्यात वारंवार अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू : गृहमंत्री 


"प्रत्येकानं आपली जबाबदारा ओळखायला हवी. देवेंद्र फडणवीसांनी पोलीस राज्य सरकारचे नोकर आहेत, असं पत्र केंद्राला पाठवलं आहे. मात्र असं अजिबात नाही. मुंबई पोलीस आपल्या उत्तम कामासाठी ओळखले जातात, कायद्यानं जे योग्य ते त्यानुसारच काम करत आहेत. सध्या राज्यात वारंवार अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.", असं गृहमंत्री म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी वारंवार स्पष्ट केलंय की, महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून हे सरकार कमकूवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. सोमय्यांनी नवी तक्रार दिली तर पोलीस त्यांची चौकशी करतील राज्यात कुणीही कायदा सुव्यवस्थेची घडी बिघडवण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच."