Navneet Rana And Ravi Rana : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या जामिन याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाच्यावतीनं राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यानंतरच सुनावणी घेण्याची तारीख ठरवू, असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा 29 तारखेपर्यंत मुक्काम कारागृहातच असणार आहे.
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्यानं जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. याआधी त्यांनी जामिनासाठी न्यायदंडाधिकारी कोर्टात याचिका केली होती. मात्र राजद्रोहाच्या आरोपांसाठी जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाही. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी ही याचिका मागे घेत राणांनी थेट सत्र न्यायालय गाठलं होतं. आज सकाळच्या सत्रात सुनावणी घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील अशी माहिती आहे. याआधी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने काल फेटाळली होती. अशातच आजच्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामानीच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.