Mumbai Power Outage : आज सकाळी ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. या बिघाडाचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमाला बसला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या उपस्थितीत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा पार पडत आहे. त्याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे वीजपुरवठा 30 ते 60 मिनिटांत पूर्ववत सुरळीत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वीज प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईसह काही भागात भारनियमन करण्यात आले.
पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. वीज पुरवठा खंडित झालेल्या काही भागांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या बिघाडाचा परिणाम टाटा वीज कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. टाटाकडून मुंबई शहरातील काही भाग आणि उपनगरात वीज पुरवठा करण्यात येतो. या बिघाडामुळे दादर, माहीम, वांद्रे येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या 400KV कळवा ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबई आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजेची मागणी सुरळीत ठेवण्यासाठी काही भागात भारनियमनही केले जाऊ शकते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे टाटा पॉवरने म्हटले.
अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
महापारेषणच्या पडघा येथील उपकेंद्रात तांत्रिक बिघाडामुळे 220 KV टेमघर, पाल, वाडा, वसई, कोलशेत, कलरकेम, आनंदनगर, जांभूळ, पलावा तसेच 100 KV भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, मोहणे, पीसे, पंजरपूर, डोंबिवली या उपकेंद्रातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे समांतर वाहिन्यांवर भार येऊन बोईसर, बेलापूर, खारघर, वाशी या ठिकाणी लोड ट्रिमिंग स्कीम (LTS) कार्यान्वित झाल्या. एकूण 518 मेगावॅटचे स्वचलित भारनियमन झाले. तसेच 400KV तळेगाव, 400 KV खारघर या वाहिन्यांवरील भार कमी करण्यासाठी मुंबई व उपनगरात (चेंबूर, धारावी, गोवंडी, चुनाभट्टी, मानखुर्द आणि वांद्रे) या भागात 498 मेगावॅट एवढे भारनियमन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत भिवंडी, टेमघर, वसई, डोंबिवली, मुलुंड, बेलापूर, ठाणे, वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड व शहापूर येथील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.
मुंबईत भारनियमन
मुंबई शहर व उपनगर परिसरात सुमारे 2250 मेगावॅट ते 2350 मेगावॅट इतके भारनियमन करण्यात आले.
राज्यपालांच्या कार्यक्रमाला फटका
आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्काऊट गाईड राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडणार होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आहेत. त्याशिवाय, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वीज पुरवठा खंडित झाला.