नवी मुंबई : 'माता न तू वैरणी' याचा प्रत्यय नवी मुंबईत आला. जास्त मस्ती करत असल्याने एका आईने पाच वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे मेणबत्तीचे चटके दिले. कळंबोलीमध्ये ही घटना घडली आहे.

मुलीचे वडील घनश्याम यादव (वय 23 वर्ष) कामावरुन घरी परतले तेव्हा चिमुकल्या मुलीची अवस्था पाहून धक्काच बसला. चटके कोणी दिले, याची मुलीकडे विचारणा केली असता तिने आई आणि काकूचं नाव सांगितलं. मुलीचे वडील भाजीविक्रेता असून त्यांचं कुटुंब कळंबोलीमधील रोडपाली परिसरात राहतं.



या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या महिलेला आणि तिला साथ देणाऱ्या मुलीच्या काकूला अटक केली आहे. अनिता यादव (वय 25 वर्ष) असं आईचं नाव असून रिंकी यादव (वय 24 वर्ष) काकूचं नाव आहे.

माझी मुलगी खट्याळ आहे. ती जास्त मस्ती करत असल्याने तिच्या आईने आणि काकूने 3 फेब्रुवारी रोजी तिला मेणबत्तीचे चटके दिले, अशी माहिती घनश्याम यादव यांनी दिली. या प्रकारामुळे मुलीचा चेहरा, पोट, पाठ आणि हातावर भाजल्याच्या खुणा राहिल्या आहेत.