सांताक्रूझच्या पोदार एज्युकेशनल कॉम्पेक्सच्या स्कूल बसच्या चालकाने गिअरऐवजी बांबू लावून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला होता. या बस चालकाने मंगळवारी सकाळी खारमधील रहिवासी असलेल्या एका बिझनेसमनच्या बीएमडब्लू कारला मधू पार्क इथे धडक दिली. यानंतर बिझनेसमनने पाठलाग करुन बस थांबवली. यावेळी चालक राज कुमार (वय 21 वर्ष) गिअरऐवजी बांबू टाकल्याचं पाहिलं.
कायदा पायदळी तुडवल्याचं लक्षात आल्यानंतर बिझनेसमनने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. मात्र नंतर जामीनावर त्याची सुटकाही झाली.
गिअर लिवरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याऐवजी बांबूचा वापर केल्याची सारवासारव चालकाने केली. तसंच दुरुस्तीसाठी वेळ न मिळाल्याने तीन दिवस गिअरऐवजी बांबू वापरत असल्याचंही त्याने सांगितंलं.
याबाबत शाळेला माहिती दिली असून आवश्यक पावलं उचलण्यास सांगितल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आरटीओकडे सोपवलं आहे.
बसमधील विद्यार्थी सुखरुप असल्याचं शाळेतर्फे सांगण्यात आलं आहे. शाळा तसंच शाळा वाहतूक समिती या प्रकरणाचा तपास करत असून प्रशासनाला मदत करत आहे. सगळ्या स्कूलबसचं लवकरच ऑडिट केलं जाईल. या प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी शाळा पुन्हा एकदा सगळ्या कंत्राटी चालक आणि स्टाफला प्रशिक्षण देणार आहे, असंही शाळेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.