नवी मुंबई : कामोठे शहरातील अंतर्गत रस्त्यावर भरधाव गाडीने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. कामोठ्यातील सेक्टर 6 मध्ये रविवारी (22 जुलै) संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असताना सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये सात वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.


रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरुन स्कोडा गाडी चालकाने, पहिल्यांदा डाव्या बाजूच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या थेट अंगावर गाडी घातली. एकूण चार दुचाकींना उडवत, पादचाऱ्यांना धडक देत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसलाही धडक दिली. गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

या घटनेत 7 वर्षीय सार्थक चोपडे आणि 32 वर्षीय वैभव गुरव या दोघांचा मृत्यू झाला. तर मृत सार्थक चोपडेची आई साधना चोपडे (वय 30 वर्ष), श्रद्ध जाधव (वय 31 वर्ष), शिफा 16 वर्षीय मुलगी (पूर्ण नाव समजू शकलेलं नाही), आशिष पाटील (वय 22 वर्ष) आणि प्रशांत माने हे पाच जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर स्कोडा चालकाने पळ काढला. कामोठे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर जखमींना उपचारांसाठी कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.