मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अबकी बार 220 पार असा नारा दिला आहे. मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, युतीचं काय करायचं, कोणाला कुठली जागा द्यायची? याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. मित्रपक्ष सोबत असतीलच, परंतु आपल्याला 288 जागांची तयारी ठेवायची आहे. यावेळी पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांना अबकी बार 220 पार असा नवा मंत्र दिला.

विधानसभा निवडणुकीत महायुती 220 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे आणि जिथे युतीतल्या पक्षांचे उमेदवार असतील तिथेसुद्धा भाजपचा उमेदवार निवडणूक लढतोय असे समजून काम करण्याच्या सुचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

एकीकडे युती, जागावाटप आणि मुख्यमंत्रीपद यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ठरलंय, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दोन्ही बाजूने अप्रत्यक्षपणे सूचक विधानं सुरु आहेत. त्यामुळे युतीच्या संसाराची ही नवीन गाठ पुन्हा एकदा घट्ट होण्याआधीच सैल होते की काय अशी चर्चा सुरु आहे.

भाजप कार्यकारिणीच्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.