नवी मुंबई : नवी मुंबईत नेरुळ-जुईनगर स्थानकादरम्यान ट्रेनमधून तरुणीला फेकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष केकरे असं आरोपीचं नाव असून त्याला शिळफाटा इथल्या पूजा पंजाब धाब्यावरुन अटक करण्यात आली.


वाशीत राहणारी 19 वर्षांची ऋतूजा बोडके या मेडिकल विद्यार्थिनीला 2 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता लुटून लोकलमधून खाली फेकलं होतं. आरोपी संतोष केकरेने ऋतुजाचा मोबाईल, बॅग आणि कानातील रिंग लुटून तिला ट्रेनमधून खाली फेकलं. सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही.

या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिस तपास करत होते. कामोठे, नेरुळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे रेल्वे पोलिसांनी आरोपीचा माग काढला.

मोबाईल, पर्स चोरुन नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीला लोकलमधून फेकलं

चार दिवसांपूर्वी पोलासांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो थोडक्यात निसटला. त्याच्या घरात लुटलेली ऋतुजाची बॅग मिळाली होती. पण मोबाईल आणि कानातील रिंगा गायब होत्या.

दरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी शिळफाटा इथल्या पूजा पंजाब धाब्यावर छापा टाकत, संतोष केकरेला अटक केली. याआधी कल्याण ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. आरोपी हा उल्हासनगरमधल्या माळभ गावचा रहिवासी आहे.