नवी मुंबई : नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच हजाराच्या वर गेली असून मृत्यूचे प्रमाणही 200च्या घरात पोहोचले आहे. विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेत आरोग्य यंत्रणा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे उपस्थित होते. नवी मुंबईत कोरोना हॉस्पिटल उभे केले असले तरी प्रत्यक्ष काम करण्यासाठी डॉक्टर, नर्स उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा लावलेली नाही. यामुळे रूग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने रुग्ण दगावण्याचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. येत्या आठवड्यात येथील आरोग्य यंत्रणा न सुधारल्यास भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.


सरकार एकीकडे सांगते की, रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, पालिका रुग्णालयात उपचार न मिळाल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे करावे लागत आहे. त्या ठिकाणी लाखो रुपयांची बिलं त्यांच्या माथी मारुन लुट केली जात आहे. हे थांबलं पाहिजे, सर्वांना या योजनेत समावेश करुन घ्या आणि ज्या रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी वाढीव बिले आकारली आहेत, ती त्यांना परत देण्यात यावीत. त्याच बरोबर कोराना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या इंजेक्शनची किंमत 40 हजाराच्या घरात आहे. हा खर्च नवी मुंबई महानगरपालिकेने उचलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी पालिका याबाबत सकारात्मक असल्याचा शब्द आपल्याला दिला असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आयुक्तांच्या बदलीचा खेळखंडोबा सरकार करीत असून संबंधीत भागातील पालकमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली.


पाहा व्हिडीओ : नवी मुंबईतल्या कंटेन्मेंट झोनमध्ये 29तारखेपासून लॉकडाऊन,पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा



रुग्णांच्या प्रमाणात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड व इतर उपचाराच्या सुविधांची वाढ करा : गणेश नाईक


बेलापूर, वाशी आणि नेरुळ येथील पालिकेची रुग्णालये कोविड रुग्णालये केल्याने कोविड व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करुन घेताना नागरिकांची परवड होत आहे. त्यामुळे वाशी येथील कोविड-19चे रुग्णालय सिडको प्रदर्शनी केंद्रातील विशेष कोविड रुग्णालयात हलवून वाशीचे पालिका रुग्णालय इतर आजारांवर उपचारासाठी खुले करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे.


समन्वय अधिकार्‍याची नेमणूक करा : गणेश नाईक


नागरिकांना सध्या कोरोनाच्या नावाने लाखो रूपयांना लुबाडले जात आहे. खाजगी रुग्णालयाकडून लावण्यात येणाऱ्या फिवर नियंत्रण ठेवता यावे. कोविड रुग्णालयांमधून कसे उपचार करुन घ्यायचे याबाबत सर्वसामान्य नागरिक माहिती मिळावी. यासाठी रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वय अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


..अन् मशिदीचं रुपांतर झालं रुग्णालयात; भिवंडीतील मुस्लीम बांधवांची सामाजिक बांधिलकी


गरज पडल्यास शिक्षकांना आठवड्यातून दोनदा शाळेत बोलवणार, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी


शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी सरकारच्या हालचाली; नवे सॉफ्टवेअर तयार करण्याचे आदेश