भिवंडी : शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या परिसरातील खासगी डॉक्टर्सनी देखील आपली प्रॅक्टिस बंद केलेली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांपासून सामान्य रुग्णांवर उपचार होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे इथल्या एका मशिदीचे रुपांतर कोविड रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सीजन पुरवठा केंद्रात करण्यात आले आहे. या ठिकाणी सहा डॉक्टरांची टीम आणि वीस तरुणांची टीम दिवस-रात्र या ऑक्सिजन सेंटरवर सेवा देत आहे.


भिवंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती टेक्सटाइल इंडस्ट्री आणि परराज्यातील मजुरांचे काम करण्यासाठीचं ठिकाण. मुंबईचे उपनगर असलेल्या भिवंडी शहरात गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा धसका घेऊन अनेक परप्रांतीय मजुरांनी भिवंडी सोडून आपलं राज्य गाठलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भिवंडी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या परिसरातील खाजगी डॉक्टर्सनी देखील आपली प्रॅक्टिस बंद केलेली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत देखील भिवंडीतील मुस्लीम बांधवांनी त्यांच्या एका मशिदीमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन सेंटर तयार करून एक सामाजिक आपुलकी जपलेली आहे. स्थानिक जमात ए इस्लामी हिंद (JIH), मुव्हमेंट फॉर पिस अॅड जस्टिस या मशिदीच्या ट्रस्टच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलिंडर आणि पाच खाटांची सोय केली आहे. याशिवाय जमात ए इस्लामी हिंदचे कार्यकर्ते घरपोच ऑक्सीजन सिलिंडरची सेवाही विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत.


मशिदीत उभारले क्वॉरंटाईन सेंटर
भिवंडी निजामपूर क्षेत्रात सध्या कोरोना विषाणूचा प्रकोप वाढला असून 1,332 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 88 पीडित मृत झाले आहेत. कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्याने शहरातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी पर्याप्त उपचार आणि क्वॉरंटाईन सुविधांचा अभाव झाला आहे. स्थानिक पातळीवर 3 जुलैपर्यंत संपूर्ण शहरात लॉकडाऊन केले आहे. कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्याला अस्वस्थ वाटू लागलं किंवा अन्य कुठलाही त्रास सुरू झाला की त्याचे पाय रुग्णालया ऐवजी या मशिदीकडे वळतात आणि तो इथे येऊन आपली व्यथा सांगतो. या ठिकाणी असणारी डॉक्टरांची टीम या रुग्णांची तातडीने तपासणी सुरू करतात. जर रुग्ण गंभीर असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करतात आणि ज्यांना ऑक्सिजनची तातडीने गरज आहे अशा रुग्णांना मशिदीमध्ये तयार केलेल्या एका विभागात दाखल करतात. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहा डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आलेली आहे.
Corona Update | राज्यात आज सर्वाधिक 5024 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्णसंख्या दीड लाखांच्या पार


रुग्ण कोणत्याही जातीचा आणि धर्माचा असो सर्वच नागरिकांना मशिदीमध्ये तयार करण्यात आलेल्या या ऑक्‍सिजन सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात येतं. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करून घेण्यात येतात. या रुग्णांच्या सेवेसाठी साधारण वीस मुस्लीम तरुणांची टीम या ठिकाणी सदैव तैनात असते. संपूर्ण भारतात कोरोनाचं मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असताना सर्व जाती-धर्माची प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही मंदिरांनी स्वतःत कडील रक्कम कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे जमा ही केली होती. असे असताना भिवंडीतील मुस्लीम बांधवांनी आपली मशिद कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिल्याने एक नवी सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे.


पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'मुंबई पॅटर्न' राबवणार! 


भिवंडी परिसरात बहुतांश कामगार वर्ग राहत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच पैशाची चणचण राहते. कोरोनाच्या काळात त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही. भिवंडी शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आम्ही मशिदीची जागा कोरोना ग्रस्तांसाठी 'ऑक्सिजन सेंटर' सुरू करण्यासाठी देण्याचे ठरविले आणि काम सुरू केलं . आमच्यात कामाला अनेकांनी हातभार लावला आणि हे काम सुरू झालं.


मशिदीमध्ये ऑक्सीजन सेंटर सुरू केल्यानंतर सर्व जाती-धर्माचे रुग्ण या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्याने रुग्ण या सेंटरवर पाठवले जातात आणि इथं त्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवा दिली जाते. ऋग्नसेवा केल्यानं निश्चितच आम्हाला समाधान मिळत आहे. सहा डॉक्टरांची टीम आणि वीस तरुणांची टीम दिवस-रात्र या ऑक्सिजन सेंटरवर सेवा देत असल्याची माहिती मुहम्मद अली यांनी दिलीय.


Dhananjay Munde | आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडतो : धनंजय मुंडे