नवी मुंबई : आडतीच्या मुद्द्यावर काल एकमत झाल्यानंतरही आज नवी मुंबईच्या व्यापारी आणि दलालांनी शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 8 टक्के आडत कुणी द्यायची, या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा तब्बल 500 ट्रक माल राहण्याची भीती होती. पण दलालांनी माघार घेत, तूर्तास कुणाकडूनही आडत घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं भाजीपाल्याचं वितरण आता सुरु होणार आहे.
काल मुंबईत सरकार, शेतकरी प्रतिनिधी आणि अडत व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत आडत शेतकऱ्यांकडून वसूल न करणे, व्यापाऱ्यांनाही एपीएमसी कायद्याच्या बंधनातून मुक्त करणे, असे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आजपासून एपीएमसीमध्ये व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याप्रमाणे माल घेऊन शेतकरी बाजार समितीमध्ये दाखल झाले. पण पुन्हा तोच प्रश्न समोर आला, आडत द्यायची कुणी? शेतकऱ्यांचा माल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी वसूल केली जाणारी आडत देण्यास व्यापारीही तयार नव्हते. त्यामुळे बाजार समितीतल्या दलालांनी आडतीशिवाय माल घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाशवंत असलेल्या मालाचं करायचं काय? असा प्रश्न उभा राहिला.
सकाळी या मुद्द्यावरून शेतकरी, बाजार समितीतले दलाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली. पण आता बाजार समितीतल्या दलालांनी तूर्तास शेतकरी आणि व्यापारी या दोघांकडूनही दलाली घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
पण बाजार समितीतले दलाल आणि व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे कष्टाने पिकवलेला भाजीपाला घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांना आज पुन्हा एकदा खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाला.