Mumbai Cricket Association Election 2024: मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे (Mazgaon Cricket Club) प्रतिनिधी म्हणून निवड  करण्यात आली आहे. त्यामुळे नाना पटोले आता मुंबई (Mumbai News) क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार असतील. यापुर्वी अनेक नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व केलं होतं. यामध्ये विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या नेत्यांनंतर आता माझगाव क्रिकेट क्लबची धुरा नाना पटोलेंच्या हाती सोपवण्यात आली आहे. अशातच आता नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार, यात काही शंकाच नाही. 


दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहिली आहे. यंदाही राजकीय समीकरण बदलल्यानं ही निवडणूक चर्चेत असेल यात काही शंकाच नाही.  


मुंबई क्रिकेट असोशिएशनं महत्त्व काय? 


मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच, एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जायचं. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.


एमसीए मुंबई क्रिकेट संघाचंही संचालन करते आणि मुंबई जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आयोजित करते. एमसीचा मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. मुंबई क्रिकेट संघानं विक्रमी 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडूही एमसीएच्या संघाकडून खेळले आहेत. मुंबईचा संघ ऐतिहासिकदृष्ट्या बॅटिंग पॉवरहाऊस म्हणून ओळखला जातो. 


मुंबई क्रिकेट असोशिएशनची स्थापना 1930 मध्ये बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून झाली. बॉम्बेचं मुंबई असे नामकरण झाल्यानंतर नाव बदलण्यात आलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचं संचालन करणाऱ्या संस्थांपैकी एमसीए एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. एमसीए व्यतिरिक्त विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, जी विदर्भातील प्रदेशावर नियंत्रण ठेवते आणि उर्वरित महाराष्ट्रातील क्रिकेटचे संचालन करणारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही संस्था आहे.