नालासोपारा : गॅसचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाल्याच्या घटना वारंवार वाचण्यात किंवा पाहण्यात येत असतात. गेल्याच आठवड्यात बिहारमधील एका हॉटेलमध्येही गॅसचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता नालासोपारा (Nalasopara) येथील हॉटेलमध्येही अशीच दुर्घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथे पालिकेच्या गटाराच्या कामात गॅस लाईन तुटल्याने जोरदार स्फोट होवून येथील एक हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं आहे. या भीषण दुर्घटनेत हॉटेलमधील चार कर्मचारी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 


नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील मुख्य रस्त्यावर पालिकेच आर.सी.सी. गटाराचं काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने काम सुरू असताना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास जेसीबीच्या साहय्याने खड्डा खोदत असताना, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तेथूनच गेलेली गॅस पाईपलाईन तुटली. त्यानंतर, गॅसने पेट घेतल्याने जवळच असलेलं हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी आलं. तर, शेजारीच असलेल्या एम.एस.ई.बी.च्या ट्रान्सफार्मरलाही आग लागल्याने काही वायरी रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी तात्काळ तेथील रस्ता बंद करण्यात आला आहे. 


या दुर्घटनेत हॉटेलमधील कर्मचारी सुंदर शेट्टी (वय ६२), गोपाळ बांगेरा (वय ७०), चंद्र मागकर (वय ४५), राजकुमार शाह (वय २७) जखमी झाले आहेत. यातील गोपाळ बांगेरा हा गंभीर जखमी असून अधिक प्रमाणात भाजला आहे. सध्या चौघांवरही नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हॉटलच्या पहिल्या आणि दुस-या मजल्यावरील घरांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान, या आगीच्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. त्यामध्ये, गॅसची पाईपलाईन फुटल्याने आगीचा भीषण स्फोट होत असल्याचे दिसून येते. तसेच, आगीचा स्फोट झाल्यानंतर हॉटेलमध्ये मोठा भडका उडाल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.