मुंबई : उरण (Uran) येथे सापडलेल्या अज्ञात तरुणीच्या मृतदेहाचं गूढ (Mankhurd Murder Case) उकललं आहे. उरणमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची आता ओळख पटली असून मानखुर्द येथील तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. मयत तरुणीचा प्रियकर असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरनेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात उरण पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी मृत महिलेचा प्रियकर टॅक्सी चालक निजामुद्दीनुद्दीन अली याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.


कुटुंबियांनी दाखल केली बेपत्ता झाल्याची तक्रार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरण येथे सापडलेला मृतदेह पूनम क्षीरसागर (Poonam Kshirsagar) या 27 वर्षीय तरुणीचा आहे. पूनम मानखुर्द येथील रहिवासी होती आणि घरकाम करायची. तिचा मृतदेह 25 एप्रिल रोजी रायगडच्या उरण येथे कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता मानखूर्द आणि उरण पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. 


अशी पटली मृतदेहाची ओळख


18 एप्रिल रोजी सकाळी पूनम तिच्या कामावर गेली पण घरी परतली नाही. तिच्या आई-वडिलांनी तिच्या मालकाकडे तिची चौकशी केली असता, ती सायंकाळी तेथून निघून गेल्याची माहिती मिळाली. यानंतर  पूनमच्या कुटुंबीयांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. उरण पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून ओळख पटवण्यासाठी आवाहन केलं होतं. उरण पोलिसांनी दिलेल्या तपशिलांच्या आधारे, मानखुर्द पोलिसांनी पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, ज्यांनी तिच्या ब्रेसलेट आणि कपड्यांवरून कुटुंबियांनी ओळख पटवली. शवविच्छेदनात पूनमचा गळा दाबून बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं.


नेमकं काय घडलं?


तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले की, नागपाडा येथील निजामुद्दीनुद्दीन अली खान (Nizamuddin Ali) हा पूनमला मानखुर्द येथून दररोज टॅक्सीने नागपाडा येथे सोडत असे. निजामुद्दीनने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं की, 18 एप्रिल रोजी तिचं काम संपल्यानंतर तो आणि पूनम खडवली येथे गेले आणि तिथे ती बुडाली असं सांगितलं.


निजामुद्दीनने दिली हत्येची कबूली


निजामुद्दीनने पोलिसांनी सांगितलं की, बुडाल्यानंतर तो पूनमला सरकारी रुग्णालयात घेऊन गेला जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. घाबरून त्याने तिचा मृतदेह उरणमध्ये फेकून दिला. त्यानंतर निजामुद्दीन खानला उरण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं, पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी निजामुद्दीनची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.


तो प्रसंग ठरला ट्रिगर पॉईंट


चौकशी केली असता निजामुद्दीनने पूनमचा गळा आवळून हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचं कबूल केलं. पूनमचे प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता आणि त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर त्याने तिची हत्या केली. 18 एप्रिल रोजी कामावरून सुटल्यावर निजामुद्दीन पूनमला खडवलीला घेऊन गेला. यावेळी तिला काही जणांचे फोन आले, यातून निजामुद्दीनचा संशय बळावला. हे फोन कॉल्सच हत्येची ट्रिगर पॉईंट ठरला. फोन कुणाचा यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि निजामुद्दीनने गळा आवळून पूनमची हत्या केली.