Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) शनिवारी 17 डिसेंबरला मुंबईत (Mumbai) भव्य मोर्चा पाड पडतोय आणि यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांपासून सलग बैठकांचं सत्र देखील पाहिला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत. आज विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत मोर्चाचं नियोजन देखील केल्याचं पाहायला मिळालं आहे
अद्याप मोर्चाला परवानगी नाही
या मोर्चासाठी परवानगी मिळावी यासाठी देखील नुकतंच काँग्रेस (Congress) नेते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नरेंद्र राणे आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) पांडुरंग सपकाळ यांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले आहे. या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आली नसली तरी विरोधकांना मोर्चासाठी परवानगी मिळेल आणि मोर्चा भव्यदिव्य होईल असा विश्वास मविआचे नेते व्यक्त करत आहेत.
कसं असेल मोर्चाचं नियोजन?
- - मोर्चा रिचर्डसन क्रुडास मिल ते टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगपर्यंत निघेल
- - जास्तीत जास्त उपस्थितीसाठी कार्यकर्ते रेल्वे, लोकलचा वापर करतील
- - सीएसटी स्थानकाच्या मागे पार्किंग व्यवस्था असेल
- - गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला निवेदन द्यावे
- - शिवसेनेच्या प्रत्येक शाखेसाठी एक बस देण्यात आली आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उपनगरातील कार्यकर्त्यांसाठी बस व्यवस्था
- - मुंबईतल्या येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी पाणी व्यवस्था स्थानिक पदाधिकारी करतील
- - मोर्चा संपल्यानंतर समन्वय समितीची टीम संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्याचं काम करेल
गर्दी जमवण्यासाठी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांवर जबाबदारी
महामोर्चासाठी तीनही पक्षाच्या एकत्रित बैठका पार पडत असतानाच पक्षांतर्गत देखील बैठका पार पडत आहेत. गर्दी जमवण्यासाठी तालुकाध्यक्षांपासून शहाराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. नुकत्याच राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान 20 हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी करण्याचे टार्गेट देण्यात आल्याची माहिती आहे
मोर्चाला सपा, सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा
महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपाल हटाओपासून शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याबाबतच्या मागण्या मोर्चात पाहायला मिळणार आहेत.