नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात राहणारा इकरार खान ओमान मधून बेपत्ता झाला आहे. नोकरीनिमित्त ओमानमध्ये गेलेल्या इकरारचा 20 डिसेंबरपासून काहीच थांगपत्ता नसल्याची माहिती त्याची बहीण हाजरा शेख हीनं दिली आहे. मात्र तो पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचा संशय आहे.

नालासोपाऱ्यातील समेळपाडा परिसरात राहणारा इकरार खान ओमानमध्ये एसी रिपेअरिंगचं काम करतो. मूळ उत्तर प्रदेशातील खुशीनगरच्या असलेल्या इकरारने 20 डिसेंबरला कुटुंबीयांशी संपर्क साधून पैसे पाठवत असल्याचा निरोप दिला. मात्र त्यानंतर ओमानचा त्याच्या कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही.

इकरार हा 2011 मध्ये सर्वप्रथम नोकरीसाठी ओमानला गेला होता. 2013 मध्ये तो परत आला आणि 14 मे 2014 ला त्याने लग्न केलं. एक-दीड महिना उत्तर प्रदेशला राहून तो पुन्हा ओमानच्या सल्तनत ओमान या कंपनीत नोकरी करु लागला, असं त्याच्या बहिणीने सांगितलं आहे.

वसईतील तरुणाची जमैकात गोळ्या झाडून हत्या


इकरारच्या शोधासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयाशी अनेक वेळा संपर्क केला. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इकरार पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचा फोन इकरारच्या नातेवाईकांना 25 जानेवारी 2017 ला एका पाकिस्तानी इसमाने केला. इकरार कोणत्या तुरुंगात आहे, हेही त्याने सांगितलं, मात्र तो अरबी भाषेत बोलल्याने नेमका पत्ता, त्याचं काय झालं ते समजलं नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. यानंतर कुटुंबीयांची काळजी अधिकच वाढली आहे.