Mumbai Film City: मुंबईतील फिल्मसिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत लवकरच आऊटडोअर शूटिंगसाठी रेल्वे स्थानकाचा सेट (Railway Station Set) तयार केला जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटीत रेल्वे स्थानकाचा सेट तयार करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी (10 जून) सांगितले. मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत रेल्वे स्थानकाच्या सेटसाठी जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांच्या सततच्या मागणीमुळे हे पाऊल उचललं गेलं आहे.
वास्तविक आणि खऱ्याखुऱ्या रेल्वे स्थानकांवर चित्रपटांच्या चित्रिकरणाची परवानगी मिळणं कठीण असल्याचं अनेक चित्रपट निर्मात्यांनी म्हटलं आहे, त्यासाठी मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये रेल्वे स्थानकाचा सेट तयार करण्यात यावा अशी मागणी बरेच दिवसांपासून जोर धरू लागली होती. चित्रपट निर्मात्यांच्या याच मागणीला अनुसरुन हा सेट साकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच, सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी सांगितलं आहे.
खऱ्या रेल्वे स्थानकांवर चित्रपटाची शूटिंग केल्यास रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसतो, रेल्वे वाहतूक विस्कळीत होते आणि प्रवाशांची देखील गैरसोय होऊ शकते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील शूट हे सेटवर करणं जास्त सोईस्कर पडतं, असं मत देखील अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केलं. शिवाय, फिल्मसिटीत असलेले सध्याचे 16 इनडोअर स्टुडिओ देखील टप्प्याटप्प्याने अपग्रेड केले जात आहेत, असंही ते म्हणाले.
मराठी लेखकांनी लिहीलेले स्क्रिप्ट अपलोड करण्यासाठी पोर्टल देखील विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं ते म्हणाले. या पोर्टलमुळे मराठी लेखकांना चांगल्या प्रोडक्शन हाऊसचा शोध घेणे सोपे होणार आहे, असंही ते म्हणाले. कोविड-19 प्रसारामुळे विलंब झालेले चित्रपट आणि मनोरंजन धोरणं देखील तयार करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
गोरेगावमध्ये 521 एकर जागेवर पसरलेली फिल्मसिटी 1977 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ती राज्य शासनाच्या महाराष्ट्र फिल्म, स्टेज, कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केली जाते. अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे गोरेगाव पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ वसलेलं एकात्मिक फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक रेकॉर्डिंग रूम, बागा, तलाव, थिएटर आणि मैदाने आहेत जी अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांचे सेट म्हणून वापरली जातात. बऱ्याच चित्रपटांची शूटिंग येथे होते.
हेही वाचा:
Mumbai: एनसीबीची डोंगरी परिसरात मोठी कारवाई! 20 किलो अंमली पदार्थ आणि कोट्यावधी जप्त; तिघांना अटक