Mumbai Crime: गेल्या अनेक वर्षापासून डी कंपनीसाठी हॉटस्पॉट ठरलेले डोंगरी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. यंदा एमडी या अंमली पदार्थ तस्करीसाठी डोंगरी चर्चेला आले आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईने डोंगरी परिसरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा फर्दाफाश केला आहे, यात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 किलो मेफेड्रोन (MD) जप्त केले आहे. अंदाजे 45 ते 50 कोटी रुपयांचे हे ड्रग्स आहे. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, सिंडिकेट टोळीच्या एका महिलेसह दोन प्रमुख सदस्यांना अटक करण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात आली होती.
एनसीबीने या कारवाईत 1.10 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली असून छाप्यात 10 लाख रुपये किमतीचे 186.6 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हे ड्रग्समधून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून घेण्यात आले होते. एनसीबीला मुंबईच्या डोंगरी भागात असलेल्या एका रॅकेटबद्दल प्राथमिक माहिती मिळाली होती, ही टोळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनच्या तस्करीमध्ये सक्रिय सहभागी असल्याची माहिती एनसीबीला समजली. ही टोळी एमएमआर प्रदेशाच्या विविध भागांमध्ये ड्रग्स विक्री करत होती. इंटेलिजन्स नेटवर्क तातडीने सक्रिय करण्यात आल्यामुळे त्वरित डोंगरी येथील एन. खान नावाच्या व्यक्तीची ओळख पटली.
एनसीबीला 9 जूनला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार एन. खान याच्याकडे डोंगरी येथील मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनचा साठा असल्याचे समजले. एनसीबी मुंबईने एन. खानच्या राहत्या ठिकाणी सापळा लावला आणि त्यावेळी त्याचा सहकारी ए.अली देखील परिसरात उपस्थित असल्याचे एनसीबीच्या लक्षात आले. त्याच्याकडे देखील ड्रग्स उपलब्ध असल्याची माहिती मिळताच, ए. अली याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून 3 किलो मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले.
एन. खानच्या घराची झडती घेऊन तात्काळ पाठपुरावा केल्याने त्याच्या घरातून आणखी 2 किलो एमडी जप्त करण्यात आले. एन. खानच्या राहत्या ठिकाणी चौकशी केली असता डोंगरी येथील ए. एफ. शेख नावाच्या महिलेची देखील ओळख पटली, जिने त्याला ड्रग्स पुरवले होते. त्यानंतर तात्काळ एनसीबी मुंबईची दुसरी टीम त्या भागात गेली आणि पुरवठादार महिला ए. एफ. शेखच्या घराची झडती घेतली. प्राथमिक घराच्या झडतीदरम्यान, 15 किलो मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले, जे आवारात लपवून ठेवले होते.
पुढील विस्तारित शोधामुळे 1 कोटी 10 लाख 24 हजार रोख रक्कम आणि 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जाब विचारल्यानंतर हे सर्व ड्रग्सची विक्री करुन आलेल्या उत्पन्नातून जमा झाल्याचं तिने कबूल केलं. यासोतच तिच्याकडून आणखी काही आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.
तिन्ही आरोपींची चौकशी केली असता, ते गेल्या सात ते दहा वर्षांपासून या अवैध ड्रग्स तस्करी व्यवसायात गुंतल्याचे निदर्शनास आले. पुरवठादार महिलेचे नेटवर्क अनेक शहरांमध्ये होते आणि ती करोडो रुपयांच्या ड्रुग्सचा मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असल्याने तिने अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांना तोंड देण्यासाठी एक कंपनी देखील स्थापन केली होती. या टोळीतील काही सदस्यांवर आधीच एनडीपीएस कायदा, 1985 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्सच्या पैशातून निर्माण झालेल्या उर्वरित साथीदारांचा आणि इतर मालमत्तेचा शोध घेण्यासाठी सखोल तपास केला जात आहे. तसेच, या प्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे का? हे आताच सांगणं कठीण होईल, मात्र तपास सुरू आहे.
हेही वाचा: