नालासोपारा : इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. या शस्त्राचा वापर वाईट पद्धतीने केल्यास माणूस अडचणीतच येतो. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातील एक तरुण चक्क यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बाईकचोरी करायला शिकला आणि त्याची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.


19 वर्षांचा दुर्गेश खोपटकर घरबसल्या युट्युबच्या माध्यमातून बाईकचोरीचे व्हिडिओ पाहायचा. त्यानंतर त्याने परिसरातील 10 मोटरसायकल्स चोरल्या. त्यातली एक मोटरसायकल विक्रीसाठी आणताना पोलिसांनी त्याला अटक केली.

दुर्गेश खोपटकर नालासोपाऱ्यातील हनुमान नगर परिसरात रहायचा. त्यानं शिक्षण सोडलं होतं, त्यानंतर त्याला नोकरीही लागली नव्हती. त्यामुळे त्यानं मौजमस्ती करण्यासाठी चोरीचा पर्याय निवडला. यूट्यूब व्हिडिओ पाहून त्याने बाईक चोरण्याची कला अवगत केली.

बाईकचोरीची पद्धत शिकून दुर्गेशने परिसरातील 10 बाईक्स चोरल्या. यापैकी एक बाईक विकताना पोलिसांनी त्याला पकडलं आणि गजाआड केलं. त्यामुळे मौजमजेचा शॉर्टकट वापरल्यास त्याचा शेवट वाईट होतो, हे पुन्हा सिद्ध झालं.