नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात आधुनिक काळातला लखोबा लोखंडे पाहायला मिळाला आहे. 'शादी डॉट कॉम', 'जीवनसाथी' अशा नामवंत विवाह संस्थाच्या वेबसाईटवरुन प्रज्वल देशमुखनं आतापर्यंत 13 जणींना गंडा घातला आहे.


आपण रिलायन्स कंपनीत उच्च पदावर आहोत, महिन्याचा पगार 2 लाख रुपये आहे. असं प्रोफाईल या लफंग्याने विवाह संस्थांच्या वेबसाईटवर टाकलं होतं. शिवाय इंग्रजीवर कमांड असल्यानं अनेक मुली या बोलबच्चनच्या जाळ्यात अलगद सापडल्या.

आरोपी प्रज्वल देशमुख हा साधारणपणे घटस्फोटीत, विधवा आणि वयानं मोठ्या असणाऱ्या महिलांनाच हेरायचा. महिलांचा विश्वास संपादन झाला, की तो डाव साधायचा. आपण काम करत असलेल्या कंपनीत एका चुकीच्या प्रपोझलवर स्वाक्षरी झाली. त्याची भरपाई म्हणून पैसे हवे आहेत, असं कारण तो द्यायचा.

त्याच्या या भूलथापांना अनेक महिला बळी पडल्या. अनेकांनी स्वतःचे दागिने विकले, तर काहींनी चक्क कर्ज काढून प्रज्वल देशमुखला पैसे दिले. या महाभागानं आणखी काही जणींना फसवल्याचा अंदाज आहे.

अशा प्रकरणात महिला बदनामीच्या भीतीनं समोर येत नाहीत. त्यांनी समोर यावं आणि अशा लोकांपासून सावध राहावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.