मुंबईतील घरात वृद्धेचा सांगाडा प्रकरणात नवा ट्विस्ट
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2017 08:37 PM (IST)
पोलिसांनी महिलेच्या डायरीतील अक्षराशी चिठ्ठीतील हस्ताक्षर जुळवून पाहिलं आहे. फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुंबई : मुंबईतल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये वृद्धेचा सांगाडा आढळल्याच्या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. महिलेच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असं त्यात लिहिल्याची माहिती आहे. रविवारी आशा साहनी यांचा मुलगा ऋतुराज अमेरिकेहून परतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे दार तोडण्यात आलं. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. आत शिरताच आशा यांच्या मृतदेहाचा सांगाडा दिसला. त्यानंतर पोलिसांनी घरात केलेल्या तपासात सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी महिलेच्या डायरीतील अक्षराशी चिठ्ठीतील हस्ताक्षर जुळवून पाहिलं आहे. फॉरेन्सिक टीम आणि फिंगर प्रिंट टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.