सातारा : एक तरुणी, बारावी पास, महिना 18 हजार रुपये पगार आणि तीन वर्षांत 16 कोटींची कमाई. तिच्याकडे गाडीपासून बंगल्यापर्यंत सगळं आहे. हे वाचून विचार येईल की, केवळ 18 हजार रुपये पगार असूनही 3 वर्षांत कोणीही 16 कोटी कसे काय कमावू शकतं?


 

पण या तरुणीने हे 16 कोटी रुपये मेहनतीने नाही तर अफरातफर करुन मिळवली आहे. वृषाली बामने असं या ठक तरुणीचं नाव आहे. वृषाली एका कंपनीत असिस्टंट अकाऊंटण्ट म्हणून काम करत होती. मात्र तिने केलेली अफरातफर समोर आल्यानंतर कंपनीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या.

 

वृषाली बामनेची संपत्ती

साताराच्या कराडमध्ये 3 मजली बंगला, टेरेसवर स्विमिंग पूल - किंमत 5 कोटी

मुंबईजवळच्या डोंबिवलीमध्ये 2 ते 2.50 कोटींचे 5 फ्लॅट

22 लाखांची ह्युंदाई एलेंत्रा

14.85 लाखांची इनोव्हा

8 लाखांची मारुती स्विफ्ट

16.55 लाख महिंद्रा एक्सयूव्ही

22 लाखांची रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड

2.13 लाखांची होंडा सीबीआर बाईक

सुमारे 18.23 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळं आणि रोकड

 

 

कराडमध्ये आलिशान बंगला, डोंबिवलीत महागडे फ्लॅट्स



वृषाली बामनेचा साताऱ्याच्या कराडमध्ये 5 कोटींचा तीन मजली आलिशान बंगला आहे. बंगल्यातील 7 बेडरुम एसी आणि एलसीडी टीव्हीने सुसज्ज आहे. बंगल्याच्या टेरेसवर एक स्विमिंग पूल आहे. बंगल्याचं इंटीरिअर अतिशय सुंदर आहे. नुकतंच बंगल्यात लाखो रुपयांचे सोफा आणि लायटिंग करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मुंबईजवळच्या डोंबिवलीमध्ये तिचे 5 फ्लॅट्स आहे. 3777 या नंबरच्या 4 लक्झरी गाड्या आहे. तर एक बुलेट बाईक आणि स्पोर्ट्स बाईक आहे.

 

 

अकाऊंटमध्ये अफरातफर आणि आलिशान आयुष्याची चटक

वृषाली बामनेने विज्ञान शाखेतून 12 पर्यंत शिक्षण घेतलं आणि तिला असिस्टंट अकाऊंटण्टची नोकरी मिळाली. वृषाली मुंबईच्या फोर्टमधील महालक्ष्मी रोप वर्क्स नावाच्या कंपनीत काम करत होती. 2008 मध्ये नोकरीवर रुजू झाल्यानंतर तिने तिथल्या कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला. मग काय विज्ञान शाखेतून शिकलेली ही तरुणी अकाऊंटची महारथी बनली. वृषाली सर्व कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये त्यांचे पगार जमा करण्याचं काम करु लागली.

 

 

या अधिकाराचा वापर करत वृषालीने 2013 मध्ये स्वत:च्या अकाऊंटमध्ये 18 हजारांऐवजी 36 हजार टाकले. परंतु कंपनीमधील कोणालाही शंका आली नाही. यानंतर वृषालीची हिंमत वाढली. कंपनीच्या अकाऊंटमधून पैसे काढून पती, आई आणि वडिलांच्या अकाऊंटमध्ये जमा करायला लागली. याच पैशांच्या जोरावर ती आलिशान आयुष्य जगू लागली.

 



ऑडिटमध्ये वृषालीची लबाडी समोर आली

वृषालीने हळूहळू तीन वर्षांत कंपनीचे 16 कोटी रुपये लांबवले. यंदाच्या मार्च महिन्यात कंपनीच्या ऑडिटमध्ये 2 कोटींचा हिशेब लागत नसल्याचं समोर आलं. यानंतर कंपनीने मीटिंग बोलावली. यात वृषालीलाही बोलावलं. पण बाथरुममध्ये जाण्याचा बहाणा करत वृषालीने तिथून पळ काढला. यानंतर कंपनीचा वृषालीवरचा संशय अधिकच बळवला. यानंतर पुन्हा 3 वर्षांचं ऑडिट करण्यात आलं आणि त्यातून जे समोर आलं, ते पाहून कंपनीचे मालकही आवाक् झाले. कंपनीने आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये वृषाली बामनेविरोधात पोलिसात तक्रार केली .

 

 

परदेश भ्रमंतीचं स्वप्न पूर्ण होण्याआधी वृषाली गजाआड

18 हजारांचा पगार घेणाऱ्या वृषालीने कुटुंबीयांसह भारत भ्रमण आणि हेलिकॉप्टर रायडिंगही केलं. त्यानंतर परदेशात जाण्यासाठी वृषालीने पासपोर्टसाठी अर्जही केला होता. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी तिच्याकडून लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. वृषाली आणि तिचा पती सचिन सध्या तुरुंगाची हवा खात आहेत.