स्वस्तिक पार्क परिसरात गुरुवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ यांच्यावर चंद्रोदय सोसायटीमध्ये असलेलं नारळाचं झाड कोसळलं होतं. जवळच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आज पहाटे कांचन नाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महत्त्वाची बाब म्हणजे सोसायटीने 17 फेब्रुवारीला हे झाड कापण्यासाठी अर्ज केला होता. तसंच यासाठी आवश्यक 1380 रुपयांची रक्कमही भरण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाडाची पाहणी केली. झाड मजबूत असून ते कापण्याची आवश्यकता नाही, असा अहवालही सोसायटीला दिला होता.
दरम्यान, कांचन नाथ यांचे पती रजत नाथ यांनी संपूर्ण प्रकारासाठी मुंबई महापालिकेला जबाबदार धरलं आहे. हे झाड कधीही कोसळू शकतं, असं सांगूनही पालिकेने सोसायटीला झाड कापण्याची परवानगी दिली नाही, असं रजत नाथ म्हणाले.
आता झाड कोसळल्यानंतर स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी महापालिकेच्या झोन-5 चे उपायुक्त भारत मराठे यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करुन, संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
पाहा व्हिडीओ