मुंबई : मुलांच्या ताब्यावरुन झालेल्या भांडणातून पतीने पत्नीच्या तोंडावर चक्क पेपर कटरने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून तिच्यावर वोकहार्ड्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिरारोड इथे मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.


मिरारोडच्या नयानगरमध्ये राहणाऱ्या स्नोबर खानचं लग्न बोरीवलीत राहणाऱ्या इम्रान असला खानबरोबर आठ वर्षापूर्वी झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही महिन्यांपासून दोघांमध्ये सतत भांडण होत होतं. त्यातच पतीने हुंडा मागितल्याची तक्रार पत्नीने पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात केसही दाखल केली होती. कोर्टाने दोन्ही मुलांचा ताबा आईकडे दिला होता. स्नोबर ही मिरारोड इथे आपल्या आईकडे राहत होती. मात्र इम्रानला दोन्ही मुलांचा ताबा स्वत:कडे हवा होता. मंगळवारी इम्रान मुलांच्या शाळेत पोहोचला आणि त्यांच्या कस्टडीची मागणी करु लागला. तिथेच त्याचं पत्नीसोबत भांडण झालं. हे भांडण मिरारोड पोलिस ठाण्यात पोहोचलं.

पोलिसांनी इम्रानची समजूत घालून मुलांच्या ताब्यासाठी कोर्टाकडे दाद मागण्यासाठी सूचवलं. परंतु पोलिस ठाण्यातून निघालेल्या इम्रानने पत्नीचा पाठलाग केला आणि पेपर कटरने तिच्या तोंडावर वार केला. सध्या तिच्यावर मिरारोडच्या वोकहार्ड्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी इम्रानला अटक केली आहे.