Mumbai Water Cut:  मागील 15 दिवसांपासून पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गुंदवली ते भांडुप संकूल दरम्यानच्या जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. त्यामुळे महिनाभरासाठी असलेली पाणीकपात मुदतीआधीच मागे घेण्यात आली आहे. मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने 18 दिवसात पूर्ण केले. आता हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक 23 एप्रिल 2023 पासून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. 


 


विक्रमी वेळेत काम पूर्ण 



भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास 75 टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या 5500 मिलीमीटर व्यासाच्या 15 किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी हा जलबोगदा 31 मार्च 2023 पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 मार्चपासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे 30 दिवसांच्या कालावधीसाठी 15 टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती.


हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे 100 ते 125 मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे 4.2 किलोमीटर अंतरावर होते. सुमारे 125 मीटर खोल आणि 4.2 किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर मोठे आव्हान होते. अखेर आज (18 एप्रिल 2023) या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अंदाजे 30 दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष 18 दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.


तीन ते चार दिवसांत मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत


दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे उद्या 19 एप्रिल 2023 पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.