Aaditya Thackeray : मुंबईतील रस्त्याची आणि पुलाची कामे दोन आठवड्यापासून खडीच्या पुरवठ्या अभावी ठप्प झाली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांचा खडी पुरवठा कंत्राटामध्ये हस्तक्षेप असून त्यांच्याच कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी सरकारचा दबाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्ते, पुलाच्या कामाबाबत मुंबई महापालिकेने (BMC) स्पष्टीकरण देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. वरळीतील डिलाईल रोड येथील पूलाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. खडीच्या टंचाईमुळे काम आणखी उशिराने पूर्ण होणार असल्याची चिन्हं असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. हे अतिशय धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
सीएम-'करप्ट मॅन'च्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले. एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत असल्याची टीका आदित्य यांनी केली.