मुंबई : मुंबईतील सर्वच विभागात 12 दिवसांसाठी 10 टक्के पाणी कपात होणार (Mumbai Water Cut) असल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे. मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम होणार असल्याने मुंबईतील सर्वच विभागांमध्ये पाणी कपात करण्यात येणार आहे. 


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबईमधील आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ते शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 या कालावधीत मुंबई महानगरात तसेच मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या हद्दीतील भागांसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. 
      
मुंबई महानगरातील सर्व विभागातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. 


या आधीदेखील होता पाणी पुरवठा बंद


मुंबई महापालिकेने 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद केला होता. दक्षिण मुंबईतील केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालयात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.  मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होते. या अंतर्गत 900 मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचं तसेच 300 ते 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.