मुंबई : कांदिवलीत (Kandivali) महाराणा प्रताप उद्यानात काँग्रेसकडून आयोजित छठपूजाला (Chhath Puja ) पालिकेने परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबईत छठपूजेवरुन एकच वाद सुरु झाला. छटपूजा हा उत्तर भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. मविआतील काही पक्षांकडून मुंबईत छठपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण या कार्यक्रमाला पालिकेकडून परवानगी नाकाराण्यात आली आहे. त्यामुळे मविआतील इतर पक्ष शिंदे आणि भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय
19 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत छठपूजा साजरी केली जाणार आहे .मुंबईत अनेक ठिकाणी छठपूजेचे आयोजन पूर्वीपासून काँग्रेस नेते आणि पदाधिकारी करत आले आहेत . परंतु मागील काही वर्षांपासून काँग्रेसकडील छठपूजेचं महत्त्व कमी करत त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी खेचण्याचं काम छठपूजेच्या निमित्ताने आता भाजपकडून करण्यात येतंय.त्यामध्ये काँग्रेसकडून आयोजित छठपूजेला पालिकेने परवानगी देऊ नये म्हणून भाजप शिंदेकडून खोडा घातला जातोय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.
नेमका वाद काय?
कांदिवलीत महाराणा प्रताप उद्यानात काँग्रेसकडून आयोजित छठपूजेला पालिकेने परवानगी नाकारली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून ही परवानगी नाकारल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. जुहू येथे संजय निरुपम यांच्यामार्फत दरवर्षी छठपूजाचा आयोजन केले जातं. गेली काही वर्ष इथे हा वाद पाहायला मिळतोय. मात्र यंदा पालिकेने उशिराने परवानगी दिलीये. घाटकोपर पूर्व येथील मैदानावर छट पूजेचे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका राखी जाधव करत असतात . मात्र यंदा त्यांना देखील परवानगी मिळालेली नाही. जिथे परवानगी मागितली जाते, तिथे ती सरसकट द्यायला हवी, असं मविआ पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. पण ती परवानगी दिली जात नसल्याचं या नेत्यांनी म्हटलंय.
छठपूजावरून राजकीय रस्सीखेच
छठपूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये. त्यात मुंबईत छठपुजेच्या परवानगी वरुन काँग्रेसकडून होणाऱ्या आरोपवार भाजप नेते ही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. टीका करत आहेत.मुंबईत जवळपास 80 ठिकाणी छठपूजाचं आयोजन करण्यात येतं. त्यामध्ये जुहू,कुलाबा,दादर चौपाटी, मरीन ड्राईव्ह, गोरेगाव आणि इतर ठिकाणी पालिका तलाव निर्माण करुन मोठ्या प्रमाणावर छठपूजेचं आयोजन केलं जातं. पण सध्या या परिसरातील छठपूजेवरुन राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय.
छठपूजेवरुन सध्या राजकारण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. एकेकाळी छठपूजेला विरोध करणाऱ्या मनसेचा देखील विरोध होता, पण आता तो पण मावळलेला आहे. राज्यातील राजकारणाची समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळतोय. आगामी काळात मुंबई महापालिका आणि लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी दहीहंडी, गणपती, नवरात्री आणि साजऱ्या होणाऱ्या दीपावली पाठोपाठ छठ पूजेच्या आयोजनाची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलीये. यावरूनच काँग्रेससह मविआतील इतर पक्ष आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा :
मनोज जरांगेंच्या 'बालेकिल्ल्या'त भुजबळांची तोफ धडाडणार; उद्या जालन्यात 'आरक्षण बचाव एल्गार'