Mumbai Water Cut : मुंबईकरांना आता पाणी आणखी काटकसरीने वापरावे लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातही ही 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.   


यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे 70 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजे 9.77 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.


पाणी कपात कधीपर्यंत?


दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. महापालिकेने मुंबईकरांना पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: