Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. हदगाव तालुक्यातील जांभळा परीसरातील चार गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळं पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. या ढगफुटीमुळं पेरलेली पिकं खरडून जाऊन प्रचंड नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, या ढगफुटीमुळं नद्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी पेरणी केलेली पिकं, शेतातील मातीसह वाहून गेली आहेत. तर अचानक सुरु झालेल्या या पावसामुळं नद्यांना पूर येऊन शेती कामासाठी गेलेले अनेक शेतकरी नदी पलीकडे अडकून पडले होते. दरम्यान या पुरामुळं शेतात अडकून पडलेल्या शेतकऱ्यांची सुटका गावकऱ्यांच्या मदतीने करण्यात आलीआहे. ही ढगफुटी हदगाव तालुक्यातील तामसा, जांभळा, शेंदन, डाक्याची वाडी, धन्याची वाडी आदी गाव परिसरात झाली.
कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचं मोठं नुकसान
या मुसळधार पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर नदी, नाले दुथडी भरुन वाहून अनेक शेतात पाणीच पाणी झालं आहे. त्यामुळं शेतातील खरीप हंगामात पेरलेली कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर पुराच्या तडाख्यात खरडून वाहून गेलं आहे. दरम्यान, तब्बल तासभर पडलेल्या या पावसामुळं परिसरातील नदी, नाले, शेत पाण्यानं तुडुंब भरले आहे. नदीच्या पात्रातील पुराचं पाणी गावात शिरले होते. तर अनेक गावातील गल्ली, रस्त्यावर, जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. या जोरदार पावसामुळं अनेक रस्त्यावरील पूल व रस्ते वाहून गेले आहेत. यामुळं वाहतुकीची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे जांभळा गावाच्या पुलावरुन तीन ते चार फूट पुराचं पाणी जात असल्यानं पैलतीराकडील गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा, वाहनधारकांचा शहराशी दोन तास संपर्क तुटला होता. त्यामुळे सर्वत्र वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.